Girija Dhudhat
लेखिका पुरातत्वज्ज्ञ असून त्यांनी पुरातत्वशास्त्र विषयात इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथून २०२२ साली उच्चशिक्षण पूर्ण केले आहे. ‘भारतीय शस्त्रे’ हा त्यांच्या संशोधनाचा प्रमुख विषय असून गेली दहाहून अधिक वर्षे त्या भारतीय शस्त्राभ्यास क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘भारतीय शस्त्रे’ या विषयावर काम करताना त्यांनी मध्युगीन भारतीय शस्त्रांवरील ‘शस्त्रवेध: मध्ययुगीन भारताचे शस्त्रपर्व’ (२०१९) या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त पुस्तकाचे लेखन केलेले आहे. जानेवारी २०२५ पासून सकाळ वृत्तपत्राच्या सप्तरंग पुरवणीमध्ये ‘शस्त्रवेध: शस्त्र ते शास्त्र’ या पाक्षिक सदराचे त्या लेखन करत आहेत. २०२३ पासून महाराष्ट्र शासनासोबत ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या मराठाकालीन शस्त्रप्रदर्शनावर शस्त्रतज्ञ म्हणून काम करताना या प्रदर्शनाच्या ‘शिवशस्त्रशौर्यगाथा: सातारा आवृत्ती’, ‘शिवशस्त्रशौर्यगाथा: नागपूर आवृत्ती’, ‘शिवशस्त्रशौर्यगाथा: कोल्हापूर आवृत्ती’ या द्विभाषिक, विस्तृत शस्त्रसूचीं पुस्तकांचे लेखन केले आहे. ‘शस्त्र ते शास्त्र’ हे भारतीय शस्त्रांवरील प्रकाशित होणारे त्यांचे पाचवे पुस्तक आहे.
भारतीय शस्त्रे या क्षेत्रातील विविध विषयांवर त्यांनी २०२० साली युक्रेन येथे झालेल्या आणि २०२२ साली पोलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र संशोधन परिषदांमध्ये ‘भारतीय तलवारी’ आणि ‘पट्टा शस्त्र’ यांवर शोधनिबंध सादर केलेले आहेत. तर नोव्हेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ मध्ये त्यांनी जर्मनी आणि इंग्लंडमधील लीड्स येथे भारतीय शस्त्रांवर शोधनिबंध सादर केलेले आहेत. २०२३ सालापासून लेखिका भारतीय शस्त्रांवरील ‘शस्त्र उवाच’ या ऑनलाईन ब्लॉगचे सक्रिय लेखन करत आहेत.
भारतीय शस्त्रे या विषयाचा अभ्यास करताना भारतातील व भारताबाहेरील संग्रहालयांना भेटी देण्याबरोबरच सालारजंग संग्रहालय, निजाम संग्रहालय, हैदराबाद, गुरुद्वारा बरमबालासाहब, हैदराबाद, अहमदनगर वस्तुसंग्रहालय व संशोधन केंद्र, अहमदनगर येथील तसेच विविध वैयक्तिक शस्त्रसंग्रहांच्या दस्तऐवजीकरण आणि संवर्धनाचे काम केलेले आहे. शस्त्राभ्यास विषयातील दस्तऐवजीकरण, संशोधनात्मक लेखन, संवर्धन, प्रदर्शन व संयोजन अशा विविधांगी शाखांमध्ये काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. महाराष्ट्रातील विविध शासकीय संग्रहालयांमधील शस्त्रांचे दस्तऐवजीकरण, संशोधन करण्याचा त्यांचा २०२१ पासून अनुभव आहे. गिरिजा दुधाट यांनी धानेटी, मांडवी या गुजरातमधील पुरातत्वीय स्थळांवर तसेच चांपानेर, पावागढ या जागतिक वारसास्थळी युनेस्कोतर्फे झालेल्या उत्खननांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. WSP या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपनीमध्ये त्यांनी पुरातत्व सल्लागार म्हणून काम केलेले आहे.